Rajgad Rain: राजगड तालुक्यात पावसाचा धुडगूस! ओढे-नाले ओसंडून वाहिले; जनजीवन विस्कळीत
Rajgad Rain: वेल्हे परिसरातील ओढ्या-नाल्यांना अचानक पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम; पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग संकटात.

Rajgad Rain – राजगड किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या राजगड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर इतका वाढला आहे की, तालुक्यातील ओढे आणि नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. याच अंदाजाची प्रचिती सोमवारी (दि. ६) वेल्हे परिसरात येत आहे.
सकाळी ७ वाजेपासून पावसाचा जोर सातत्याने वाढत आहे. पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कामावर निघालेले नागरिक आणि शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. पावसामुळे अनेक शेतींच्या बांधापर्यंत पाणी आले आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांच्या नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. वेल्हे हा डोंगरी भाग असल्याने मुसळधार पावसामुळे पाणी थेट शेतात शिरत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
शेतात पाणी साचल्याने पेरणी केलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे हे रौद्ररूप पाहता, पुढील काही तास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा
तालुक्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने, नदी-नाल्यांच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे मातीची धूप होण्याचा धोका असल्याने आणि काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पर्यटकांनी तसेच स्थानिकांनी गड-किल्ल्यांवर किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





