Pune rural flood | तळेगाव ढमढेरेत पावसाचा कहर! ; वेळनदीवरील पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे – पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव ढमढेरे येथील वेळनदीला पूर आला असून, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरी जनजीवन विस्कळीत झाले असून, सोमवारचा आठवडे बाजारही विस्कळीत झाला. विठ्ठलवाडी येथे काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान मोठे झाले आहे.विठ्ठलवाडीच्या पाटलाच्या मळ्यात रात्री साडेदहाच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सात ते आठ घरांत पाणी शिरले. यामुळे रहिवासी भयभीत झाले होते.
रात्री दोनच्या सुमारास पाणी ओसरले. याचबरोबर, तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील मुरळ ओढ्याचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ थांबली होती. श्रीनाथ मंदिरा जवळील वेळनदीवरील पूल, तसेच तळेगाव-कासारी फाटा बाह्यवळण रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. आठवडे बाजारातही दुपारपर्यंत पाऊस सुरू असल्याने गर्दी कमी होती. ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

