Mahabaleshwar rain: महाबळेश्वरमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! मुसळधार पावसामुळे शहर अलर्ट मोडवर; हेल्पलाईन नंबर जारी
Mahabaleshwar rain: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर शहर अलर्ट मोडवर; आपत्ती व्यवस्थापन पथक २४ तास तैनात, नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे सतर्कतेचे आवाहन.

Mahabaleshwar rain – महाबळेश्वर शहरासह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे. महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि नगरसेवकांनी नागरिक व पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. महाबळेश्वर परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी पालिका प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे किंवा रस्ते खचण्याचा धोका वाढला असल्याने, अशा ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. सोशल मीडियावरील अपुर्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणार्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घरात पाणी शिरणे, झाडे पडणे, रस्ता खचणे किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी पालिकेच्या 02168-260220 या हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाबळेश्वर पालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी 24 तास सज्ज असल्याचा विश्वास सुनील शिंदे आणि योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.





