Maharashtra Politics : राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा रंगू लागली आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शिंदे गटाने मिशन विदर्भवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Maharashtra Politics) अकोला येथे माध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी यांनी येत्या काळात विदर्भात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला. विदर्भातील विविध पक्षांतील अनेक आजी-माजी खासदार, आमदार आणि निवडणुका लढवलेले दिग्गज नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मोठे पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics) अलीकडेच बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला विदर्भात मोठा चेहरा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यानंतर आता संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेने विदर्भात विशेष रणनीती आखल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics) राजन साळवी हे सध्या शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख असून गेल्या काही दिवसांत त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी अकोला जिल्ह्यात अनेक दौरे केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते सध्या विदर्भात सक्रिय झाले आहेत. (Maharashtra Politics) श्रीकांत शिंदेंचा राज्यव्यापी संवाद दौरा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथ स्तरावर मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी संवाद दौरा सुरू होत आहे. हा दौरा १६ मे ते १५ जुलैदरम्यान तीन टप्प्यांत पार पडणार असून २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. दौऱ्याचे तीन टप्पे पहिला टप्पा (मे महिना) नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आणि संघटनात्मक आढावा होणार आहे. दुसरा टप्पा (जून महिना) जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसरा टप्पा (जुलै महिना) बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत दौरा होणार आहे. राजन साळवी यांच्या दाव्यानंतर आता विदर्भातील कोणते नेते शिंदे गटात प्रवेश करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.