Pune Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या 24 तासांत धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Pune Khadakwasla Dam : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून मागील तीन दिवसांत धरणात महिनाभराचा पाणीसाठा वाढला आहे.
शहरातील पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने दोन दिवस पाणीकपात रद्द केलेली आहे. वाढलेल्या पाणीसाठ्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज दिनांक 06 जुलै 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता 32% टक्के क्षमतेने भरले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या 24 तासांत धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती. असं सांगण्यात आलं आहे.





