Mahayuti Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर
Mahayuti Politics: पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यातील हा 'कोल्ड वॉर' आता कोणता वळण घेतो आणि भाजपची ही 'ऑफर' महेश शिंदे स्वीकारतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Mahayuti Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला अनुपस्थित राहून महेश शिंदे यांनी बंडाचे संकेत दिले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
बॅनरवरून फोटो गायब; आमदारांची कार्यक्रमाला दांडी –
कोरेगाव शहरात नुकतेच शिवसेना संपर्क कार्यालय आणि तीन शाखांचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले. शिवसेनेच्या या संघटनात्मक कार्यक्रमात स्थानिक आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती अनिवार्य मानली जात होती. मात्र, केवळ ते गैरहजरच राहिले नाहीत, तर कार्यक्रमाच्या अधिकृत बॅनरवरूनही त्यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
‘६८ कार्यक्रम आणि ४२ लग्नं’; महेश शिंदेंचे स्पष्टीकरण –
या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना आमदार महेश शिंदे म्हणाले की, “माझे आधीच अनेक कार्यक्रम नियोजित होते. एकाच दिवसात ६८ कार्यक्रम आणि ४२ विवाह सोहळे असल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही.” बॅनरवरील फोटो काढल्याबद्दल विचारले असता, त्यांनी फारसे महत्त्व न देता सूचक विधान केले. “कोणीही कायमस्वरूपी पद घेऊन आलेले नसते. मी विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. जे लोक कालपर्यंत विरोधात होते, ते आज मंचावर बसले असतील तर अशा गोष्टींकडे मी गांभीर्याने पाहत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
भाजपची ‘ओपन ऑफर’; जयकुमार गोरेंनी टाकली गुगली –
एकीकडे महेश शिंदे यांची नाराजी समोर येत असतानाच भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी यात उडी घेतली आहे. गोरे यांनी महेश शिंदे यांना थेट भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.
“महेश शिंदे हे आमच्याच विचारसरणीचे आहेत. जर त्यांना सध्याच्या ठिकाणी काही अडचण वाटत असेल, तर त्यांनी खुशाल भाजपमध्ये यावे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. सातारा जिल्ह्यात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील,” असे विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे.
शिंदे गटासाठी धोक्याची घंटा?
महेश शिंदे हे सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाचे एक वजनदार आमदार मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जर त्यांनी भाजपची वाट धरली, तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जाईल.
पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यातील हा ‘कोल्ड वॉर’ आता कोणता वळण घेतो आणि भाजपची ही ‘ऑफर’ महेश शिंदे स्वीकारतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





