मोठी घडामोड..! राज ठाकरेंची भेट अन् फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन; पडद्यामागे हालचालींना वेग

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज (21 ऑगस्ट) मोठ्या हालचाली घडल्या आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन सुमारे 45 मिनिटे चर्चा केली, तर दुसरीकडे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उपराष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात फोन केला.
खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, फडणवीस यांच्यासह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून NDA उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी फडणवीसांची महत्त्वाची भूमिका
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी मधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून NDA च्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचाच भाग म्हणून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. संजय राऊत यांनी याला दुजोरा देताना म्हटले, फडणवीस आणि राजनाथ सिंह यांचे फोन उद्धव ठाकरेंना आले. त्यांनी मतदानासाठी विनंती केली आहे. हे त्यांचे काम आहे, आणि ते इतरांशीही संपर्क साधत असतील, असं संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरे-फडणवीस भेटीमागील चर्चा
आज सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलच्या दारुण पराभवानंतर घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही, आणि भाजप नेत्यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, राज ठाकरे यांच्याबाबत भाजप नेत्यांनी सहानुभूती आणि सौम्य भूमिका घेतल्याचे दिसले. यामुळे राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील संभाव्य जवळीक आणि भविष्यातील युतीच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गणपतीचे निमंत्रण देण्यासाठी भेट : संजय राऊत
संजय राऊत यांनी या भेटीवर उपरोधिक टिप्पणी करताना म्हटले, “राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटी अनेकदा होतात. कदाचित ते गणपतीचे निमंत्रण देण्यासाठी गेले असतील. विरोधी पक्षनेते भेटायला गेले, त्यांच्यात काही चर्चा असेल तर होऊ द्या.” राऊत यांनी या भेटीला फारसे राजकीय महत्त्व नसल्याचे सूचित केले, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (BMC) पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.





