कोकणात राज ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच, आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, समीकरणे बदलणार?

रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय रिंगण तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डबल धक्का बसला आहे. बडतर्फ केलेले माजी खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांचाही भाजप प्रवेश लवकरच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींमुळे महायुतीला बळकटी मिळत असून, मनसेला तळ कोकणात मोठे खिंडार पडले आहे.
वैभव खेडेकरांचा जोरदार पक्षप्रवेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे नाराजी व्यक्त केली होती. २२ सप्टेंबरला शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना होताना त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. हे घटनाक्रम मनसेसाठी मोठा धक्का असून, कोकणातील निवडणुकीच्या रिंगणात भाजपला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
अद्वैत कुलकर्णींचा भाजप प्रवेश निश्चित?
वैभव खेडेकरांप्रमाणेच माजी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांचाही भाजप प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पक्षापासून दुरावले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा राजकारणात सक्रिय होत असून, भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कुलकर्णींच्या या निर्णयामुळे मनसेला कोकणात आणखी एक शिलेदार गमावावा लागणार असून, भाजपची ताकद वाढणार आहे. स्थानिक राजकीय सूत्रांनी सांगितले की, कुलकर्णींचा प्रवेश लवकरच अधिकृत होईल.





