गणेशभक्तांना घेऊन जाणारी खासगी बस जळून खाक; रत्नागिरी-कशेडी बोगद्याजवळील घटना

Ratnagiri Bus Fire | मुंबईत कामानिमित्त आणि नोकरीसाठी आलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी पुन्हा कोकणात निघाले आहेत. याचदरम्यान एका खासगी बसचा रविवारी पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ही खासगी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस मुंबईहून मालवणच्या दिशेनं जात होती. मध्यरात्री 2च्या सुमारास ही बस रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ आली असता, बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने ही बाब लक्षात येताच बस चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजुला घेतली आणि प्रवाशांना खाली उतरवलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.
गणेशभक्तांचं सर्व सामान जळून खाक
खेड अग्निशमन दलाला तातडीने या घटेनची वर्दी देण्यात आली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. मात्र गणेशभक्तांचं सर्व सामान जळून खाक झालं आहे. यानंतर संबंधित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
बसला ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र ही बस मुंबईहून मालवणच्या दिशेनं जात असताना बसचे चाक गरम झाले आणि बसने अचानक पेट घेतल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने गणेशउत्सवापूर्वी मोठा अनर्थ टळला. Ratnagiri Bus Fire |
हेही वाचा:
Pune Gramin | खतासाठी गेलेल्या शेतकऱ्याशी वाद; कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित





