Mumbai weather : मुंबईत पावसाच्या सरी.! अर्णवमुळे राज्यातील हवामानात बदल
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते.

Mumbai weather – राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळू लागला आहे. मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी होत असून, काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे दिवसभरातील उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णव चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात बदल झाल्याचे चित्र आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी त्याच्या प्रभावामुळे वातावरणात बदल जाणवत आहेत.
कालपासून राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात शुक्रवारी प्रामुख्याने उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात.
मुंबईत आज कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता तुलनेने अधिक आहे. मुंबई आणि उपनगरांसाठी सकाळी 12.30 वाजेपर्यंत हलक्या पावसाचा यलो वॉच देण्यात आला होता.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.






