Vijay Wadettiwar : आता रायगडवरही संकट.! ‘सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राची नैसर्गिक ढाल’ – विजय वडेट्टीवार
वन्यजीवांचे अधिवास नष्ट करून नेमके काय साध्य करायचे आहे? उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती नष्ट करू नका, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात जंगलतोडीचे काम जोरात सुरू आहे. भीमाशंकर परिसरातील जंगलावर घाला घातल्यानंतर आता रायगडमधील जंगलांवरही संकट आले आहे. १५०० मेगावॅट क्षमतेच्या अदानी यांच्या प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार झाडे तोडली जाणार आहेत.
स्थानिक ग्रामस्थ आणि विश्वस्तांना विश्वासात न घेता प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राची नैसर्गिक ढाल आहे. येथील जंगलामुळे पर्यावरणीय संतुलन टिकून आहे.
वन्यजीवांचे अधिवास नष्ट करून नेमके काय साध्य करायचे आहे? उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती नष्ट करू नका, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात ८५ ते १२५ च्या दरम्यान डेटा सेंटर आहेत. अदानी-अंबानींना यासाठी फुकटात जमिनी देण्यात आल्या आहेत. या डेटा सेंटरसाठी लाखो लिटर पाण्याची गरज असते. आमचा डेटा सेंटरला विरोध नाही.
मात्र सर्वसामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागेल. हे मोठ्या लोकांचे चोचले आता बंद झाले पाहिजेत. देशातील ६० टक्के डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर सरकारने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे आणि नवीन डेटा सेंटरवर बंदी आणावी, ही गोष्ट आम्ही सरकारच्या लक्षात आणून देणार आहोत.
महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला असून येत्या काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी कधीही या वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर सुरू झाले नव्हते, पण आता राज्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू करावे लागत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.





