Railway Theft : रेल्वे प्रवाशांनो सावधान! सिग्नल यंत्रणेत बिघाड करून महिलांना लूटले; थरारक घटना उघड
Railway Theft : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली; अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी महिला प्रवाशांचे दागिने आणि मोबाईल लांबवले.

Railway Theft – पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर मिरज रेल्वे पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर–पुणे विशेष रेल्वे गाडीमध्ये नुकत्याच घडलेल्या लुटीच्या प्रकाराने या त्रुटी उघडपणे समोर आणल्या आहेत. पुरेशा बंदोबस्ताअभावी चोरट्यांनी थेट सिग्नल यंत्रणेत बिघाड करून गाडी थांबवली आणि अंधाराचा फायदा घेत महिला प्रवाशांना लक्ष्य केले.
घटनेदरम्यान S-3 या बोगीत खिडकीतून हात घालून मिरज येथील शांतीनगर परिसरातील मीना विकास उमापती यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम सोन्याची चेन ओढून नेण्यात आली. त्याच बोगीत नारायण पवार यांचे 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, रंजन दयानिधी साहू यांचा मोबाईल तसेच अन्य दोन महिला प्रवाशांचे दागिने चोरट्यांनी हिसकावले. काही मिनिटांत घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे संबंधित गाडीवर पोलिसांचा बंदोबस्तच नव्हता. मनुष्यबळ अपुरे असल्याने मिरज रेल्वे पोलिसांना ‘रोटेशन’ पद्धतीने गाड्यांवर बंदोबस्त करावा लागतो. परिणामी अनेक गाड्या संरक्षणाविना धावत आहेत. मिरज–कराड–सातारा हा रेल्वे मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या तीन टप्प्यांमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी सक्षम पोलिस नेटवर्कची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती याच्या उलट आहे.
घटनेनंतर उशिरा तपास सुरू
लुटमारसारख्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी प्रवाशांना मिरजपर्यंतच जावे लागते, तर कराड आणि सातारा येथील रेल्वे पोलिस ठाण्यांमध्येही कर्मचारी अपुरे असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना पुणे, सोलापूर आणि मिरज येथून श्वानपथके बोलवावी लागली. मात्र, घटनेनंतर उशिरा तपास सुरू झाल्याने चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. यामुळे तपास यंत्रणेतील समन्वय आणि तत्परतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तातडीने उपाययोजनांची गरज
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे सुरक्षेसाठी केवळ मनुष्यबळच नव्हे, तर अत्याधुनिक साधनसामग्री, सिग्नल यंत्रणांची सुरक्षा आणि गाड्यांमधील सततची गस्त आवश्यक आहे. सध्या रेल्वे पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारित सुमारे साडेतीनशे किलोमीटरचा विस्तीर्ण परिसर असूनही त्यानुसार मनुष्यबळ वाढवले गेलेले नाही, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. एकूणच, मिरज रेल्वे पोलिसांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.






