Railway Platform : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दापोडी ते आकुर्डी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढणार
Railway Platform : 'सुरक्षित यात्रा, सशक्त भारत' संकल्पनेअंतर्गत भारतीय रेल्वेची विशेष मोहीम; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिला प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा.

Railway Platform – दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डब्यांमधील मोठ्या गॅपमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. धावत्या गाडीत चढताना किंवा उतरताना अनेकदा पाय घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा घेतलेला निर्णय पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. रेल्वे प्रवाशांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
दररोज हजारो प्रवासी पुणे-लोणावळा लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करतात. मात्र, अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये मोठे अंतर राहते. विशेषतः गर्दीच्या वेळी चढ-उतार करताना प्रवाशांचा तोल जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दापोडी, कासारवाडी आणि पिंपरी स्टेशन परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठी गर्दी असते.
अनेक प्रवासी घाईत धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी प्लॅटफॉर्म आणि डब्यामधील मोठ्या गॅपमुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. स्थानिक प्रवाशांच्या मते, आतापर्यंत अनेक जणांचा तोल जाऊन दुखापती झाल्या आहेत. काही गंभीर अपघातांच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आता देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची मोहीम सुरू केली आहे.
‘सुरक्षित यात्रा, सशक्त भारत’ या संकल्पनेतून हाय-लेव्हल प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. काम सुरू असताना रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, याची काळजी घेतली जाणार आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढल्यानंतर ट्रेनमध्ये चढणे आणि उतरणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. “दररोज जीव धोक्यात घालून लोकल पकडावी लागते. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमुळे अनेकदा भीती वाटते. रेल्वेने घेतलेला हा निर्णय अत्यंत गरजेचा होता,” अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही मोहीम वेगाने पूर्ण करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.






