Pune Railway – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुणे रेल्वे विभागाने सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्षात नन्हे फरिश्ते उपक्रमाअंतर्गत ४१२ मुलांची सुटका करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. घरातील किरकोळ वादातून काही मुले घर सोडून निघून जातात. रागारागात ही मुले रेल्वेने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. राग ओसरल्यावर परत जाण्याचा मार्ग त्यांच्या लक्षात येत नाही. अशावेळी चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत आल्यावर मुलांचे भविष्य उध्वस्त होते.यामुळे मध्य रेल्वेच्या आरपीएफकडून हरविलेली, पळून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम राबविली जाते. मुलांचे समुपदेशन करून त्यांना पालकांककडे सोपविले जाते. गेल्या वर्षात मोहिमेअंतर्गत भरकटलेल्या, मानवी तस्करीला बळी पडणाऱ्या ४१२ मुलांची सुखरूप सुटका केली. त्यात ३५५ मुले आणि ५७ मुलींचा समावेश आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आरपीएफकडून गुन्हेगारांवार वचक ठेवण्यासाठी मोहीम राबविली जाते. प्रवासासंबंधित गुन्ह्यांच्या तपासात १२५ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३३.१८ लाखांचा माल जप्त केला. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या १ हजार ४९२ जणांना अटक करून ५.८० लाखांचा दंड वसूल केला. तसेच कर्तव्य बजावताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून १२ प्रवाशांचे प्राण वाचवले तर अमानत मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या विसरलेल्या २६० वस्तू सुरक्षितपणे परत दिल्या. सापार्क ऑपरेशन अंतर्गत दारू, सोने आणि रोकड तस्करी करणाऱ्या २१ जणांना पकडून ५१.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दसरा मोहिमेत ७,७६३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत ६८.४४ लाखांचा दंड वसूल केला. घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या झगमगाटामुळे अनेक मुले घरातून निघून रेल्वे स्थानकांवर येतात. काही मुले वेगळ्या राज्यात येतात. त्यावेळी स्थानकावरील आरपीएफ जवान या मुलांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांचे समुपदेशन करून पालकांकडे सोपवितात. त्यामुळे दर महिन्याला ४० ते ५० हून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम हे आरफीएस जवान व स्वयंसेवि संस्था करते.