Pune Railway Station – उत्तर भारतासह अन्य राज्यांत होळीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामध्ये चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोनसह सुरक्षिततेसाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, तीन दिवसांनी होळी असून, दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे शुक्रवारीच (दि. २७) पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या भरून गेल्या. दरवर्षी होळीच्या काळात पुणे स्थानकावरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे होळीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. परिणामी फलाटवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. गाडी पकडण्यासाठी किंवा उतरताना प्रवाशांना कसरत करावी लागते. उपाययोजनेसाठी ज्या प्रवाशांचे तिकीट पक्के आहे, त्यांनाच फलाटावर प्रवेश मिळणार आहे. इतर प्रवाशांना होल्डिंग झोनमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने आरपीएफ, सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, तसेच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या गाड्यांसाठी रांग लावण्याची सुविधा फलाट एकवर करण्यात येणार आहे. पुणे स्थानकावर एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, व्हीआयपी रूमच्या शेजारी होल्डिंग झोन तयार केला आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. या झोनमध्ये प्रवाशांसाठी पिण्याची पाणी, स्वच्छतागृह, मोबाइल चार्जिंगची सोय करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांची गाडी उशिरा आहे, त्यांना या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. “होळीच्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात आला आहे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेस्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.” – हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग