रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून, त्याआधीच स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू असलेला सुप्त संघर्ष आता उघड झाला आहे. दोन्ही पक्षांमधील कुरघोडीच्या राजकारणात आता भाजपलाही धक्का बसला असून, राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी थेट भाजपच्या स्थानिक नेत्याला गळाला लावले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या निकटवर्तीयाला शिंदे गटात खेचल्यानंतर आता भाजपच्या श्रीवर्धन मतदारसंघातील नेते रवी मुंढे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा शिंदे गटाच्या शिवसेनेत घरवापसी केली आहे. तळा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रवी मुंढे आणि त्यांच्या समर्थकांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रवी मुंढे यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अवधूत तटकरे (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे पुतणे) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत मुंढे यांचा केवळ ७७ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीने रायगड जिल्ह्यात मोठे राजकीय लक्ष वेधले होते. त्यानंतर मुंढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षांतर्गत संघटन बळकट करण्यात अडथळे येत असल्याने त्यांनी पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. प्रवेश सोहळ्यात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी रवी मुंढे यांचे हार्दिक स्वागत करताना म्हटले, “श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी रवी मुंढे यांची घरवापसी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकर्त्यांच्या साथीचा फायदा पक्षाला निश्चित होईल.” या राजकीय हालचालीमुळे श्रीवर्धन मतदारसंघातील आगामी निवडणुकांच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षांतराच्या या घटनांनी स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.