“राज्यात आम्ही महायुती म्हणून लढणार परंतु रायगडमध्ये…..”; भरत गोगावलेंचे आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठं विधान

Bharat Gogawale | Mahendra Dalvi | गेल्या अनेक महिन्यांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे. यामुळे दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
येत्या काही महिन्यावर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशातच आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी एक मोठं विधान केले आहे. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी थेट इशाराच दिला आहे.
राज्यात आम्ही महायुती म्हणून लढणार परंतु रायगडमध्ये अपवाद असेल असे विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. रायगडचा अपवाद सोडला तर राज्यात इतरत्र युतीतून लढणार असल्याचे ते म्हणाले आहे. रायगड जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबात त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे.
तसेच येथील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादीला कदापि सोबत घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे या आमदारांची कानउघडणी करणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
आम्हाला व्यूहरचना करावी लागेल
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे काही प्रवक्ते ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत ती थांबवण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीने योग्य विचार न केल्यास आगामी काळातील निवडणुकांमध्ये आमची आम्हाला व्यूहरचना करावी लागेल, असा थेट इशाराच दळवी यांनी दिला आहे.
पालकमंत्री पदावरून संघर्ष टोकाला
रायगड जिल्ह्याचा विचार करता ७ आमदारांपैकी तीन आमदार शिवसेनेचे आहेत, तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. दरम्यान, महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तोडगा काढण्यात महायुतीला यश आलेले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोणीही माघार घ्यायला तयार नाही.





