Rahul Gandhi : ‘आमचे सरकार आल्यावर अदानी-अंबानी यांना नाचायला लावू’; राहुल गांधींची जोरदार टीका

Rahul Gandhi – आर्थिक धोरण बनवायचे असेल तर ते गरिबांसाठी असले पाहिजे. भारतीय जनता पार्टीने उद्योगपतींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे आणले. अदानी-अंबानींच्या टीव्हीवर २४ तास मोदींचा चेहरा दिसतो. या वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे कार्यक्रम कधी पाहिले आहेत का? हा राज्यघटनेवरचा हल्ला आहे.
जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक देशाच्या संस्था स्वतःच्या लोकांनी भरतात आणि गरीब आणि वंचितांना स्थान देत नाहीत आणि असे करून ते संविधानावर हल्ला करतात अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि संघावर टीका केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहादुरगडमधील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी अदानी आणि अंबानींना मदत करतात असा आरोप केला. ते रोजगार व्यवस्था नष्ट करतात, संविधान नष्ट करतात. भाजपने राज्यघटना नष्ट केली आणि काँग्रेस संविधानाचे रक्षण करते. सर्व नागरिक समान आहेत असे संविधानात लिहिले आहे असे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही आत्ताच अंबानींच्या मुलाचे लग्न पाहिले. अंबानींनी मुलाच्या लग्नावर हजारो कोटी खर्च केले. हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा पैसा आहे. मात्र तुम्हाला बँकेतून कर्ज घेऊन तुमच्या मुलांची लग्ने करावी लागतात. मला हे बदलायचे आहे. तुमच्या खिशातून २४ तास पैसे काढले जात आहेत. जीएसटीची जेवढी रक्कम मुकेश अंबानी भरतात, तोच माल विकत घेतल्यास शेतकरीही तेवढीच रक्कम देतो.
जेंव्हा अंबानी-अदानी मिठाई खरेदी करतात तेंव्हा तेवढाच जीएसटी भरतात. जेवढी रक्कम मोदी अदानी अंबानींना देत आहेत, तेवढीच रक्कम आम्ही गरीब शेतकरी, माता-भगिनींना देऊ. आमचे सरकार आल्यावर आम्ही त्यांना नाचायला लावू. असा दिवस येईल जेव्हा भारताचे सरकार गरिबांचे असेल. अब्जाधीशांना जेवढी रक्कम माफ करण्यात आली आहे. तेवढीच रक्कम शेतकरी आणि गरिबांना दिली जाईल.
राहुल म्हणाले की, हरियाणात ड्रग्जची समस्या वाढत आहे. मला नरेंद्र मोदींना विचारायचे आहे की अदानींच्या मुंद्रा बंदरात हजारो किलो ड्रग्ज सापडले तेव्हा तुम्ही कोणाला पकडले आणि कोणाला तुरुंगात पाठवले? हरियाणातील लोक सैन्यात भरती व्हायचे, पण नरेंद्र मोदींनी अग्नवीर योजना आणून हा मार्गही बंद केला आहे. अग्निवीर योजना ही भारतीय सैनिकांची पेन्शन, कॅन्टीन आणि शहीद दर्जा चोरण्याचा मार्ग आहे.





