पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल बदनामीच्या खटल्यात दोषी नसल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी केला आहे. शुक्रवारी (दि.११) झालेल्या सुनावणीत राहुल गांधी त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवला. राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांची बाजू मांडणारे अॅड. मिलिंद पवार यांनी “राहुल गांधी दोषी नाहीत” असा दावा न्यायालयात केला. या प्रकरणाच्या मागील सुनावणीत विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कथित बदनामीकारक वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संदर्भ दिलेल्या पुस्तकाची प्रत न्यायालयात सादर करण्याची सात्यकी सावरकर यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणी खटला सुरू होण्यापूर्वी आरोपीला कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.