Rahul Gandhi: राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात! छात्रों की गूंज, द्वारे विद्यार्थिनींशी साधणार संवाद
Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर; ‘छात्रों की गूंज’ उपक्रमांतर्गत एसएसपीएमएस मैदानावर साधणार संवाद.

Rahul Gandhi – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. छात्रों की गूंज, या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५:०० वाजता हा संवाद सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काॅंग्रेस भवन येथे आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, संध्या सव्वालाखे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत हल्लाबोल केला. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात नीट पेपरफुटीचे मुख्य केंद्र होते.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सरकार लाठीचार्ज करत आहे. राहुल गांधी या संवादाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे प्रश्न जाणून घेऊन ते संसदेत मांडणार आहेत. पक्षात स्वतःचे नेतृत्व शिल्लक नसल्याने पैशांच्या जोरावर भाडोत्री नेते आयात करून भाजप चालवला जात आहे.
ईडीची भीती दाखवून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, असेही सपकाळ म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींच्या या दौऱ्याकडे आणि आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची चिन्हे आहेत.





