Rahul Gandhi : केंद्रातील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात; राहुल गांधींचा मोठा दावा
Rahul Gandhi : केंद्र सरकारमधील काही मंत्री विरोधी पक्षांच्या संपर्कात असून, ते सरकारमधील अंतर्गत घडामोडींची माहिती विरोधकांना देत असल्याचा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्र सरकार आणि भाजपच्या संघटनात्मक रचनेबाबत खळबळजनक दावे केले आहेत.
केंद्र सरकारमधील काही मंत्री विरोधी पक्षांच्या संपर्कात असून, ते सरकारमधील अंतर्गत घडामोडींची माहिती विरोधकांना देत असल्याचा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या संवादादरम्यान राहुल गांधी म्हणाले की “भाजपची संघटनात्मक रचना कमकुवत झाली असून, आगामी आठ महिन्यांत सध्याच्या राजकीय परिस्थितीचे परिणाम दिसून येतील.” तसेच देशातील सध्याची परिस्थिती आणि व्यवस्थेतील त्रुटी जनतेसमोर आणणे, ही काँग्रेससह विरोधी पक्षांची रणनीती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले “विरोधी पक्षांनी निवडणुका लढवणे बंद केले, तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कमी होईल आणि भाजपलाही तेच अपेक्षित आहे.”
“आमच्यासाठी भारतीय लोकशाही सर्वात पवित्र आहे. आम्ही हा विश्वास कधीही तुटू देणार नाही. प्रत्येक आघात सहन करू, प्रत्येक मतासाठी संघर्ष करू आणि देशासमोर प्रत्येक सत्य मांडू. ही लढाई सत्तेसाठी नसून संविधानाच्या रक्षणासाठी आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही लढत होतो, आजही लढत आहोत आणि यापुढेही लढत राहू,” असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच जागतिक राजकारणातील भारताच्या भूमिकेवर भाष्य करताना भारताचे स्थान दुय्यम होत असल्याचे मत त्यांनी मांडले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांमुळे केंद्र सरकार, भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता असून, त्यांच्या दाव्यांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






