Rahul Gandhi : ‘राहुल गांधी देशाची प्रतिमा खराब करत आहेत…’; शिवराज सिंह चौहान यांची जोरदार टीका

Rahul Gandhi | Shivraj Singh Chauhan – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथून ते मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्यांच्या निशाण्यावर आहे. आता राहुल गांधी यांच्या टीकेला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सलग तिसऱ्यांदा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिवराज यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे जबाबदारीचे पद असते. मी राहुल गांधी यांना सांगू इच्छीतो की जेंव्हा अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते तेंव्हा त्यांनी परदेशात कधीच भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला नाही.
लागोपाठ तीन वेळा पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनात भारतीय जनता पार्टी विरोधी, संघ विरोधी आणि नरेंद्र मोदी विरोधी भावना निर्माण झाली आहे. ते सातत्याने देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असून हा प्रकार देशद्रोहाच्या सारखाच आहे. संविधानावर हल्ला कोणी केला, देशात आणीबाणी कोणी लादली असे सवाल करत शिवराज यांनी राहुल यांच्यावर टीका केली.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक मतभेदांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की संघाचे असे मानणे आहे की भारत एक विचार आहे. मात्र आमचे असे मानणे की भारत विचारांचे वैविध्य आहे. भाजप आणि आरएसएस यांच्या विरोधातील लढा लोकसभा निवडणुकीतच स्पष्ट झाला. लाखो लोकांना त्यावेळीच जाणीव झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या संविधानावर हल्ला करत आहेत.
दरम्यान, राहुल यांच्या टीकेवर भाजपचे आणखी एक नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्याकडे त्यांच्या आजीला संघाच्या भूमिकेबाबत काही विचारण्याचे तंत्रज्ञान असेल तर त्यांनी आजीला विचारावे किंवा इतिहासाच्या पानांमध्ये डोकावावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी राहुल गांधी यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. संघ काय आहे हे देशद्रोह्यांना समजू शकत नाही.





