नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा निशाणा साधला. शहा मानसिक दबावाखाली आहेत. ती बाब संसदेने अनुभवली. तर, संपूर्ण देशाने पाहिली, अशी टिप्पणी त्यांनी केली. लोकसभेत बुधवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. त्यावेळी शहा यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या मतचोरीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चर्चेदरम्यान शहा आणि राहुल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास शहांनी टाळाटाळ केल्याचा प्रत्यारोप राहुल यांनी केला. त्यांनी गुरूवारी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना शहा यांना पुन्हा लक्ष्य केले. मी पत्रकार परिषदांमधून मतचोरी उघड केली. त्यावर संसदेत चर्चा करण्याचे थेट आव्हान मी दिले. त्यावर कुठलेही उत्तर मिळाले नाही. शहा यांनी अयोग्य भाषेचा वापर केला. त्यांचे हात कंप पावत होते. तुम्हीही ते पाहिले असणार, असे राहुल पत्रकारांना उद्देशून म्हणाले. शहा यांनी भाषणात बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याची प्रतिक्रिया त्यांनी बुधवारी दिली होती.