Pune District : कर्मयोगीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी धावपळ
Pune District : या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव तथा कर्मयोगी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक राजवर्धन पाटील यांनी पळसदेव ऊस उत्पादक गट आणि ब वर्ग प्रतिनिधी या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वडापुरी : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन हर्षवर्धन पाटील यांच्यासह विद्यमान संचालक, माजी संचालक आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव तथा कर्मयोगी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक राजवर्धन पाटील यांनी पळसदेव ऊस उत्पादक गट आणि ब वर्ग प्रतिनिधी या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विविध गटांतील राजकीय समीकरणे आणि उमेदवारी अर्ज माघारीच्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
विद्यमान आणि माजी संचालकांचे अर्ज दाखल
विद्यमान संचालक हनुमंत जाधव, वसंत मोहोळकर, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, पराग जाधव, छगन भोंगळे आणि शारदा कुबेर पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच माजी संचालक वामन सरडे आणि भास्कर गुरगुडे यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, कर्मयोगी बचाव पॅनलचे राजेंद्र देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विजयकुमार शिंदे यांनी पळसदेव ऊस उत्पादक गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्येष्ठ नेते किसन जावळे यांनी ब वर्ग प्रतिनिधी गटातून, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून भीमराव कडाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाचे विष्णू देवकर यांनीही कालठण गटातून अर्ज दाखल केला आहे.
छाननी आणि माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.





