PV Sindhu Loses : ऑस्ट्रेलियन ओपनमधून पीव्ही सिंधू बाहेर! अकाने यामागुचीकडून सेमीफायनलमध्ये पराभव; भारताचे आव्हान संपुष्टात
PV Sindhu Loses : या पराभवासोबतच सिंधूचा बीडब्ल्यूएफ विजेतेपदाचा प्रदीर्घ प्रलंबित असलेली प्रतिक्षा आणखी वाढली असून, ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हानही अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.

PV Sindhu Loses Australian Open 2026 Semifinal : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिचे यंदाच्या हंगामातील पहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. शनिवार, १३ जून रोजी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० (Australian Open) बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सिंधूला जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुचीकडून (Akane Yamaguchi) सरळ गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच सिंधूचा बीडब्ल्यूएफ विजेतेपदाचा प्रदीर्घ प्रलंबित असलेली प्रतिक्षा आणखी वाढली असून, ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हानही अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
पहिल्या गेममध्ये चुरस; दुसऱ्या गेममध्ये मात्र एकतर्फी लढत – (PV Sindhu Loses)
स्पर्धेत तिसरे मानांकन मिळालेल्या पीव्ही सिंधूने पहिल्या गेममध्ये यामागुचीला जोरदार टक्कर दिली. दोघींनीही सातत्याने आक्रमक खेळ करत प्रत्येकी सलग ६-६ गुण वसूल केले होते. गेम पॉईंट मिळवण्याची सुवर्णसंधी सिंधूच्या हातात होती, मात्र मोक्याच्या क्षणी गुण मिळवण्यात ती अपयशी ठरली आणि यामागुचीने पहिला गेम २२-२० असा जिंकला.
पहिल्या गेममधील या चुरशीनंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र खेळ पूर्णपणे पालटला. यामागुचीने सुरुवातीलाच सलग ८ गुण घेत १३-६ अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूच्या चुकांचा फायदा उठवत तिने संपूर्ण गेमवर वर्चस्व राखले आणि अवघ्या ४३ मिनिटांत हा सामना २२-२०, २१-१२ असा खिशात घातला.
END OF CAMPAIGN FOR PV SINDHU 💔
She lost to Multi times World Champion Akane Yamaguchi 20-22, 12-21 at Australian Open (S500)
WELL PLAYED SINDHU! 🙌pic.twitter.com/jV0l9Gy4hG
— The Khel India (@TheKhelIndia) June 13, 2026
विजेतेपदाची प्रतीक्षा आणखी लांबली – (PV Sindhu Loses)
Two-time Olympic medallist PV Sindhu loses to Akane Yamaguchi of Japan in straight games in women’s singles semifinal of Australian Open badminton #BWF pic.twitter.com/1Mux5qx6Ld
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2026
डिसेंबर २०२४ मधील ‘सैयद मोदी इंटरनॅशनल’ स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूला एकाही बीडब्ल्यूएफ टूरच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. या चालू हंगामातील सिंधूची ही दुसरी सेमीफायनल होती, यापूर्वी मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये तिला चीनच्या वांग झियीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या चेन सु यू हिला २१-६, २१-९ असे एकतर्फी लोळवल्यानंतर सिंधूकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यामागुचीविरुद्धच्या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये सिंधू अजूनही १५-१३ अशी पुढे असली, तरी गेल्या ६ पैकी ५ सामन्यांत सिंधूला जपानी खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला आहे. आता फायनलमध्ये यामागुचीचा सामना थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगशी होईल. (PV Sindhu Loses)





