Ayush Shetty Silver Medal : आयुष शेट्टीचा ऐतिहासिक पराक्रम! ६० वर्षांनंतर आशिया चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचत पटकावलं रौप्य पदक
Ayush Shetty Silver Medal : आयुष शेट्टीने आशिया चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचत ६० वर्षांचा वनवास संपून रौप्य पदकावर नाव कोरलं.

Ayush Shetty Silver Medal Asia Badminton Championship 2026 : चीनमध्ये पार पडलेल्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताच्या २० वर्षीय आयुष शेट्टीने आपल्या बॅडमिंटन रॅकेटने जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. जरी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्याने भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा तरुण खेळाडू आयुष शेट्टीसमोर जगातील बलाढ्य आणि माजी जागतिक विजेता चीनच्या शी युकीचे आव्हान होते. ४२ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या लढतीत शी युकीने आयुषचा २१-८, २१-१० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटपासूनच चिनी खेळाडूने आपला दबदबा कायम राखला होता. आयुषने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अनुभवी शी युकीने त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. या पराभवासह आयुषला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
६० वर्षांची प्रतीक्षा संपली –
Union Youth Affairs and Sports Minister @mansukhmandviya congratulates Ayush Shetty for winning the silver medal at the Badminton Asia Championships. https://t.co/Jb2xRLEdWb
— All India Radio News (@airnewsalerts) April 12, 2026
विजेतेपद निसटले असले तरी आयुष शेट्टीने इतिहास रचला आहे. तब्बल ६० वर्षांनंतर आशिया चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९६५ मध्ये दिनेश खन्ना यांनी ही कामगिरी केली होती आणि सुवर्णपदक जिंकले होते. आयुषच्या या रौप्य पदकाने भारतीय बॅडमिंटनमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केले आहे. त्याचा या स्पर्धेतील प्रवास एखाद्या स्वप्नासारखा होता.
जगातील दिग्गजांना चारली धूळ –
आयुषने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला पराभूत केले. इतकेच नाही तर, उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कुन्लावत वितिदसर्नला नमवून त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. सध्या जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या आयुष शेट्टीच्या रँकिंगमध्ये या कामगिरीनंतर मोठी सुधारणा होणार आहे. भारतीय क्रीडाप्रेमींना आता आयुषच्या रूपाने एक नवा जागतिक तारा गवसला असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा वाढली आहे.





