Ayush Shetty : आयुष शेट्टीने विश्वविजेत्या क्रिस्टीला लोळवत रचला इतिहास! आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक केलं निश्चित
Ayush Shetty : आयुष शेट्टीने आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Ayush Shetty reach semifinal Asian Badminton Championship : भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत दमदार विजय नोंदवला आहे. आयुषने इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित जोनाथन क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये २३-२१, २१-१७ असा पराभव केला. या विजयासह आयुषने स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले असून, अशी कामगिरी करणारा तो गेल्या सहा वर्षांतील पहिला भारतीय पुरुष एकेरी खेळाडू ठरला आहे.
अटीतटीच्या लढतीत क्रिस्टीला नमवलं –
जोनाथन क्रिस्टीविरुद्धचा आयुषचा हा पहिलाच विजय आहे. पहिल्या सेटमध्ये दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मध्यांतरापर्यंत क्रिस्टी ११-१० ने पुढे होता आणि एकवेळ त्याने १८-१५ अशी आघाडी घेतली होती. मात्र, आयुषने जिद्द न सोडता खेळ ‘ड्यूस’पर्यंत खेचला आणि २३-२१ ने पहिला सेट खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये आयुषने सुरुवातीपासूनच नियंत्रण राखले. त्याने ११-९ अशी आघाडी घेतल्यानंतर आपली आक्रमकता कायम ठेवली आणि २१-१७ ने सेट जिंकत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
Badminton Asia Championships 2026: #AyushShetty Topples World No.4 Jonatan Christie to reach semis pic.twitter.com/KKsr9wsbAp
— AIBS News 24 (@AIBSNews24) April 10, 2026
२०१८ नंतरचे पहिले पुरुष एकेरी पदक –
आयुष शेट्टीने या पदकासह २०१८ मधील एच.एस. प्रणॉयच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. २०१८ नंतर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक निश्चित करणारा तो पहिला भारतीय पुरुष एकेरी खेळाडू ठरला आहे. २०२३ मध्ये सात्विक-चिराग जोडीने जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर बॅडमिंटनमध्ये भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे.
दिग्गजांचे आव्हान संपुष्टात –
या स्पर्धेत भारताच्या इतर दिग्गज खेळाडूंना मात्र अपयशाचा सामना करावा लागला. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीतच बाहेर पडली, तर लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. अशा परिस्थितीत आयुषने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असलेल्या ली शि फेंगला हरवून आपल्या इराद्यांची जाणीव करून दिली होती. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना थायलंडचा कुनलावुत विटिडसार्न किंवा चीनचा वेंग होंगयांग यांच्यापैकी एकाशी होईल.





