Purandar Airport : पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! ६ हजार कोटींचे कर्ज मंजूर; शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरचं येणार रक्कम
Purandar Airport : सिडकोचा असणार मोठा वाटा; पुरंदरच्या ३ हजार एकर जमिनीसाठी ६ हजार कोटींचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.

Purandar Airport – पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या ३ हजार एकर जमिनीसाठी ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सहा हजार कोटींच्या निधीसाठी कर्ज उभारणीस मान्यता दिली आहे.
कर्ज उभारणीसाठी विशेष प्राधिकरणही स्थापना करण्यात आले असून, त्यामध्ये एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा समावेश आहे. या तीन संस्थांमध्ये सिडकोचा सर्वाधिक भाग असणार असून, यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी कर्ज उभारणीस आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, की या निधीतून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.





