Pune News : मोठी बातमी! बारामतीला मिळणार अपर जिल्हाधिकारी, तर चाकणला अपर तहसील कार्यालय
Pune News : पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार अन् कामाचा डोंगर; ग्रामीण जनतेची पायपीट थांबवण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय.

Pune News – जिल्ह्यात जमीनविषयक दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने दाव्यांची सुनावणी एकाच अधिकाऱ्याकडे होत असल्याने दावे निकाली निघण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे निर्णयास दोन ते तीन वर्षे लागतात. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी नव्याने आणखी एक अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केले जाणार आहे, तर खेड तालुक्यात महसूल विभागात वाढलेले कामकाज पाहता चाकण येथे अपर तहसील कार्यालय स्थापण्यास शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. पुणे जिल्ह्यात नागरीकरण, औद्योगीकरण वेगाने होत असल्याने प्रशासनाकडील कामकाजसुद्धा वाढले आहे.
जिल्ह्यात १३ तालुके असून, भौगोलिक विस्तारही मोठा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे या दाव्यांच्या निकालासाठी वेळ लागत असल्याने आणखी एक अपर जिल्हाधिकारी पद स्थापन करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.
जमिनीचे अकृषिक परवाने, जमीनविषयक दाव्यांची सुनावणी, गौणखनिज, पुर्नवसन विभाग, कुळकायदा शाखा आदी विभाग हे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. या कामकाजाव्यतिरिक्त सातबारा संगणकीकरण, जिल्हा दौरा, विविध समित्यांच्या बैठका आदींमुळे जमीनविषयक दाव्यांवर वेळेत निर्णय होत नाही. त्यामुळे बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
या तालुक्यांच्या समावेशाची शक्यता
बारामती अपर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चाकण येथे अपर तहसील कार्यालय
ज्याप्रमाणे हवेली तालुक्यात तीन अपर तहसील कर्यालय आहेत. त्याच धर्तीवर खेड तालुक्यात आणखी एक अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत शासन सकरात्मक आहे. चाकण येथे हे कार्यालय होणार असून, त्याअंतर्गत खेड तालुक्यातील निम्मी गावे या कार्यालयाशी जोडली जाण्याची शक्यता आहे.





