Salil Arora : पंजाबच्या सलिलचा ‘SMAT 2025’ मध्ये धुमाकूळ! ३९ चेंडूत शतक ठोकत ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझींना दिला संदेश

सलिल अरोराच्या ४५ चेंडूंतील १२५ धावांच्या वादळी खेळीमुळे पंजाबने सहा गडी गमावून २३५ धावांचा डोंगर उभा केला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ११ गगनभेदी षटकार मारले. विशेष म्हणजे, डावाच्या शेवटच्या षटकात त्याने झारखंडचा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राच्या षटकात तब्बल तीन षटकार आणि एक चौकार ठोकून धावांचा पाऊस पाडला.
मिनी ऑक्शनमध्ये होणार मालामाल –
सलिल अरोराच्या या धमाकेदार खेळीमुळे आता आयपीएल मिनी ऑक्शनपूर्वी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ लागण्याची शक्यता आहे. अबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी आयपीएल मिनी ऑक्शन आयोजित केला जाणार आहे. सलिल अरोराचे नाव ‘अनकॅप्ड यष्टिरक्षक’ या श्रेणीमध्ये असून, त्याची मूळ किंमत (बेस प्राईस) ३० लाख रुपये आहे. भारतीय यष्टिरक्षकाची गरज असलेल्या तीन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सारख्या फ्रँचायझी सलिल अरोरावर मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.
अभिषेक शर्माच्या शहराचा रहिवासी –
सलिल अरोरा हा देखील पंजाबचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या अमृतसर शहरातील रहिवासी आहे. ७ नोव्हेंबर २००२ रोजी जन्मलेला २३ वर्षीय सलिल अरोरा या स्पर्धेत अनेकदा चांगली सुरुवात करूनही त्याला मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करू शकला नव्हता. मात्र, या नॉकआऊट सामन्यात त्याने थेट शतकी खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली. यापूर्वी त्याने हैदराबादविरुद्ध नाबाद ४४ धावांची खेळी केली होती.





