पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी (रविवारी) लाखाहून अधिक पुणेकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर गर्दी करत पुस्तक खरेदीचा आनंद लुटला. पुणेकरांनी सकाळपासूनच महोत्सवाला कुटुंबासह भेट दिली. महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनाची तीन भव्य दालने, आकर्षक सजावट, कलाकृती, शिल्प, चित्र, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा सर्वांचा पुणेकरांनी मनमुराद आनंद लुटला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या महोत्सवाला केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी भेट दिली. सरकारी आणि खासगी कार्यालयांना आणि शाळा- महाविद्यालयांनाही सुटी असल्याने अनेकांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्याचा आनंद घेतला. महोत्सवात लहान मुलांसाठी विविध दालनांवर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे साहित्याच्या शोधात अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. यामध्ये काही दिव्यांग व्यक्तीही त्यांच्या शारीरिक मर्यादांवर मात करीत महोत्सवात आले होते. त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा होता. या वेळी एक ज्येष्ठ नागरिक इलेक्ट्रिक वॉकर घेऊन फेरफटका मारत होते, तर एक महिला तिच्या तान्हुल्या बाळाला वॉकरमध्ये घेऊन आली होती. या दोघांनाही वॉकर घेऊन जाताना कोठेच अडथळा आला नाही. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, की डिजिटल काळात वाचन चळवळ टिकविण्याचे काम ही तरुण पिढी करत असल्याचे महोत्सवाच्या प्रतिसादावरून दिसून येते. संयोजक राजेश पांडे म्हणाले, की सर्वांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, वाचन संस्कृतीला पुढे नेण्यासाठी आणि पुणे शहराला नवी ओळख देण्यासाठी पुढे यावे. यंदा पुणे पुस्तक महोत्सवास तिप्पट गर्दी वाढली आहे. नागरिक भरभरून पुस्तक खरेदी करीत आहेत. त्यामुळेच पुस्तक महोत्सवासाठी पुणे हे अत्यंत आदर्श शहर आहे. डिजिटल युगात नागरिकांचा वाचनासाठी असणारा उत्साह उल्लेखनीय आहे. महोत्सवासाठी मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक येथून लोक येत आहेत, हे महोत्सवाचे यश आहे. – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप