Pune Zilla Parishad: “मॉडेल स्कूलची चेष्टा करू नका, नको असल्यास बंद करू!” पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत सीईओ का संतापले?
Pune Zilla Parishad: नियमित शिक्षक रुजू होईपर्यंत १५ हजार रुपयांवर कंत्राटी शिक्षक भरण्याची घोषणा; अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर सभागृहातील वातावरण शांत.

Pune Zilla Parishad – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसतील तर शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारणार आणि ‘मॉडेल स्कूल’ तरी कसे यशस्वी होणार?” असा रोखठोक सवाल उपस्थित करीत पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिक्षकांची रिक्त पदे, वर्गखोल्यांची दुरवस्था, अस्वच्छता, आरटीई प्रवेशातील गैरप्रकार आदी विविध मुद्द्यांवरून सभेत गदारोळ झाला.
यावर, जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. या सभेला उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सभापती दीपाली हुलावळे, जितेंद्र बडेकर, अंकिता पाटील, अमोल नलावडे, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला नीट परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम आलेली बारामतीची जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेचे कामकाज सुरू होताच, मागील सभेतील प्रस्तावांची विषयपत्रिकेत नोंद न घेतल्याने काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांनी या सर्व नोंदी घेतल्या जातील, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.
सभेत खेड तालुक्यातील आरटीई प्रवेशातील गैरप्रकाराचा मुद्दा सदस्य विजयसिंह शिंदे यांनी लावून धरला. संपूर्ण जिल्ह्यातील आरटीई प्रवेशांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
कंत्राटी शिक्षकांची भरती करणार
यावेळी जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ६५० पदे रिक्त असल्याने मोठा गदारोळ माजला. यावर १५ ऑगस्टपर्यंत ५५० शिक्षकांची भरती शासनाकडून होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले. नियमित शिक्षक रुजू होईपर्यंत शाळा बंद पडू नयेत म्हणून १५ हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी दिली.
सीईओ गजानन पाटील संतापले
शिक्षकांअभावी ‘मॉडेल स्कूल’च्या संकल्पनेवर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताच सीईओ गजानन पाटील आक्रमक झाले. “मॉडेल स्कूलची चेष्टा करू नका; नको असल्यास हे मॉडेल बंद करू,” असा इशारा त्यांनी सदस्यांना दिला. मात्र, अध्यक्ष जगदाळे यांनी हस्तक्षेप करीत सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने या चर्चेवर पडदा पडला. त्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले.






