Khed News: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे कडक निर्देश
Khed News: पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; करंजविहिरे, खराबवाडीच्या जलवाहिनी कामांचा आढावा.

Khed News – खेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा पुणे जिल्हा परिषदेत घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. बैठकीत करंजविहिरे, भांबोली, खराबवाडी, वाघजाईनगर तसेच पुणे-नाशिक महामार्ग परिसरातील जलवाहिनी टाकण्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
वाहतूक कोंडी, रस्ते परवानग्यांमधील विलंब आणि स्थानिक प्रशासकीय अडचणींमुळे काही कामे रखडल्याचे यावेळी निदर्शनास आले. यापूर्वी खेड पंचायत समितीमध्ये संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून जलवाहिनी कामांतील तांत्रिक अडथळे, वाहतूक समस्या तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांचा अभ्यास करण्यात आला. बैठकीत जलवाहिनी टाकण्याच्या कामांमधील तांत्रिक अडथळे दूर करणे,
रस्ते परवानग्यांसाठी आवश्यक समन्वय साधणे, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. प्रत्यक्ष पाहणीनंतर झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना दिल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवून नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, माजी सभापती शरद बुट्टेपाटील, पंचायत समिती सदस्य महेंद्र मेदनकर, निखिल थोरवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. खेड तालुक्यातील नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी मिळावे यासाठी सर्व संबंधित अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.”
– गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद





