Pune : गर्लफ्रेंडशी बोलल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओचा पाठलाग करत…
Pune : दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती

पुणे : आरोपीच्या गर्लफ्रेंडशी बोलत असल्याच्या रागातून २८ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मध्यरात्री घडला. ११२ क्रमांकावर आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्कॉर्पिओचा पाठलाग करून तरुणाची सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
प्रसाद सूर्यवंशी (वय २८) याचे पेठ पोलिस चौकीच्या हद्दीतून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून अपहरण करण्यात आल्याची माहिती मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ११२ वर मिळाली. वाहनाचा क्रमांक एमएच १२ ९६९६ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने वाहनाचा शोध घेत पाठलाग सुरू केला.
पोलिसांनी वाहन अडवून प्रसादची सुटका केली. या कारवाईत सागर रमेश बोराडे (वय ३२, हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना पहाटे १ वाजून २३ मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार, प्रसाद हा सागर बोराडे याच्या गर्लफ्रेंडशी बोलत होता. या कारणावरून संतापलेल्या बोराडे याने साथीदारांच्या मदतीने प्रसादला मारहाण केली. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याला त्याच्याच वाहनातून सिंहगड रस्त्याच्या दिशेने नेण्यात आले. प्रवासादरम्यानही त्याला मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात एकूण चार आरोपींचा सहभाग असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. प्रसाद याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद आणि आरोपीची गर्लफ्रेंड हे दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
हेही वाचा:
Shirur News : महिला दोन अल्पवयीन मुलांसह बेपत्ता; शिरूर पोलिसात अपहरणाचा गुन्हा





