Shirur News : महिला दोन अल्पवयीन मुलांसह बेपत्ता; शिरूर पोलिसात अपहरणाचा गुन्हा
Shirur News : तिच्यासोबत असलेली दोन्ही मुलेही बेपत्ता असल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून अथवा अन्य प्रकारे त्यांना अज्ञात कारणासाठी घेऊन गेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

शिरूर : शिरूर तालुक्यातील रामलिंग येथून एक २३ वर्षीय महिला तिच्या दोन अल्पवयीन मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत युनुस जब्बार दरोगे (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. रामलिंग, ता. शिरूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी फिजा युनुस दरोगे (वय २३) ही दोन्ही मुलांना सोबत घेऊन रामलिंग येथे ब्लाउज शिवण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्यासोबत असलेली दोन्ही मुलेही बेपत्ता असल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून अथवा अन्य प्रकारे त्यांना अज्ञात कारणासाठी घेऊन गेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन सावळा रंग, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच असून अंगात हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस असा आहे. तिच्यासोबत असलेल्या आफाज युनुस दरोगे (वय ५ वर्षे) याचा रंग गोरा, उंची अंदाजे २ फूट ५ इंच असून त्याने लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे. तर आदिल युनुस दरोगे (वय ३ वर्षे) याचा रंग गोरा, उंची अंदाजे २ फूट असून त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे.
ही घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४३ वाजता इंट्री नं. ७७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता महिला व दोन्ही चिमुकल्यांचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील संभाव्य ठिकाणी शोध घेतला जात आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहे.सदर महिला अथवा दोन्ही मुलांबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी विलंब न करता शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





