Pune Water Supply: शहरात गढूळ पाणी का येतंय? महापालिका नाही तर ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
Pune Water Supply: खडकवासला धरणातून अवघ्या २४ तासांत विसर्ग बंद केल्याने गाळ साचला; पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांची माहिती.

Pune Water Supply – शहरातील अनेक भागांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणीपुरवठा होत आहे. महापालिका जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे पाण्यातील गढूळता कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत असली, तरी धरणातून उचललेल्या कच्च्या पाण्यातच मातीचे प्रमाण वाढल्याने प्रशासनापुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, धरणांतील पाण्याची गढूळता वाढण्यामागे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील घाटमाथ्यावर वेगाने वाढत असलेली जमिनीची धूप हे प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. घाटमाथ्यावरील डोंगरांचे बेसुमार उत्खनन, वाढती बांधकामे, घटते वनक्षेत्र आणि पावसाच्या बदललेल्या स्वरूपामुळे धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असल्याने पाण्याची गढूळता वाढली असून, त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.
धरणात मातीचे प्रमाण वाढले
गेल्या काही वर्षांत घाटमाथ्यावर पाऊस वाढला असला, तरी त्याचे स्वरूप अत्यंत अनिश्चित झाले आहे. यंदा जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने डोंगरांवर माती धरून ठेवणारे गवत उगवले नव्हते. त्यातच वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली असून, त्यासाठी डोंगर पोखरले आहेत. याच काळात काही भागांत २४ तासांत २०० ते ४०० मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणात प्रचंड माती वाहून आली. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार वाढतच असल्याने पाणी अधिक गढूळ होत आहे.
नदीतील विसर्गाचाही परिणाम
दरवर्षी जून महिन्यानंतर जुलैमध्ये खडकवासला धरणातून सलग तीन ते चार दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे धरणात साचलेला गाळही वाहून येतो. यंदा खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर अवघ्या २४ तासांत विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे धरणातील गाळ वाहून जाण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी गाळमिश्रित पाणीच महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचत आहे.
“पाणलोट क्षेत्रातील डोंगरांवर बेसुमार बांधकामे सुरू असून, वनक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. यंदा पाऊस उशिरा आणि अचानक झाल्याने पहिल्या पावसात माती धरून ठेवणारे गवतही उगवले नाही. त्यामुळे मातीची धूप होऊन ती धरणात आली आहे. ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.”
– सचिन पुणेकर, पर्यावरण अभ्यासक
“धरणातून शहरासाठी घेण्यात येणाऱ्या पाण्यात मातीचे प्रमाण अधिक असल्याने गढूळता वाढली आहे. गेल्या काही वर्षात हे प्रमाण वाढले असल्याने महापालिकेकडूनही त्यासाठी आधीच तयारी केली जाते. मात्र, या वेळी मातीचे प्रमाण जास्तच आहे.”
– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा, विभागप्रमुख






