Pune News : परिमंडळ-७ मध्ये ‘मिशन क्रॅकडाऊन’ची सुरुवात; अवैध दारू, मटका अड्ड्यांवर धडक कारवाई !
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 'मिशन क्रॅकडाऊन' या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन क्रॅकडाऊन’ या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी लोहगाव परिसरात अवैध मद्यविक्री आणि मटका अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दि. 15 जुलै रोजी दुपारी लोहगावमधील हॉटेल ब्ल्यू डायमंड येथे छापा टाकून चालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय 22) याच्याकडून 7 हजार 990 रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा आणि 2 हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात हॉटेलचे मालक सुरज गायकवाड यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर हॉटेल राजरत्न येथे टाकलेल्या धाडीत चालक संकेत भारत घोडके (वय 28) याच्याकडून 4 हजार 5 रुपयांचा मद्यसाठा आणि 11 हजार 530 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणात हॉटेलचे मालक सुहास प्रवीण मोडक यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला.
याच मोहिमेदरम्यान लोहगावमधील यशस्वी हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत भाऊसाहेब गोपीनाथ रागपसरे यांच्यासह तीन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींकडून 10 हजार 890 रुपयांची रोकड, कल्याण व मुंबई टाइम बाजारचे मटका साहित्य, पावती पुस्तके आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65(ई) अंतर्गत दोन, तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अंतर्गत एक असा एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास लोहगाव पोलीस ठाणे करत आहे.
‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीविरोधात सातत्याने धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलीसांना द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहनही त्यांनी केले.





