Pune News : रांका ज्वेलर्सने साकारल्या अर्धा किलो वजनाच्या पादुका; पंढरपूरच्या श्री विठ्ठल चरणी प्रथमच सुवर्ण पादुकांची अर्पण सेवा!
यापूर्वी श्री विठ्ठलाला चांदीच्या पादुका होत्या. मात्र, सुवर्ण पादुका अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिराच्या सोने-चांदी विभागाचे प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी दिली.

Pune : पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी प्रथमच सुवर्ण पादुका अर्पण करण्याचा ऐतिहासिक योग जुळून आला आहे. अहिल्यानगर येथील एका अनामिक भक्ताने सुमारे अर्धा किलो वजनाच्या आणि अंदाजे ५६ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पादुका श्री विठ्ठलाला अर्पण केल्या आहेत.
यापूर्वी श्री विठ्ठलाला चांदीच्या पादुका होत्या. मात्र, सुवर्ण पादुका अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिराच्या सोने-चांदी विभागाचे प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी दिली.
या सुवर्ण पादुका घडविण्याचे भाग्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सला लाभले. रांका ज्वेलर्सच्या चार कुशल कारागिरांनी अवघ्या आठ दिवसांत या पादुकांची निर्मिती केली. पादुकांवरील आकर्षक हस्तनक्षीही याच कारागिरांनी अत्यंत बारकाईने साकारली आहे.
या पादुकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे श्री विठ्ठलाच्या चरणांचे कोणतेही प्रत्यक्ष माप न घेता त्या तयार करण्यात आल्या. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या सुवर्ण पादुका श्री विठ्ठलाच्या चरणी परिधान करण्यात आल्या असता त्या अगदी चपखल बसल्याचे राजेंद्र सुभेदार यांनी सांगितले.तसेच हिंदू धर्मातील प्रमुख सण आणि महापूजेच्या दिवशी या सुवर्ण पादुका श्री विठ्ठलाला परिधान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याप्रसंगी रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तूपाल रांका यांनी ही सेवा आपल्या संस्थेसाठी अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली. यापूर्वीही रांका ज्वेलर्सला विविध देवस्थानांच्या सुवर्ण सेवेचे भाग्य लाभले असून, आता पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी खऱ्या अर्थाने चरणसेवा अर्पण करण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.




