Dehu Water Supply: देहूकरांना मोठा दिलासा! ४ दिवसांनंतर पाणीपुरवठा अखेर पूर्ववत; जलउपसा केंद्रातील गाळ काढला
Dehu Water Supply: इंद्रायणी नदीच्या महापुरामुळे बोडकेवाडी जलउपसा केंद्राच्या जॅकवेल आणि पाइपलाइनमध्ये साचला होता प्रचंड गाळ; देहू नगरपंचायतीने राडारोडा हटवून यंत्रणा केली पुन्हा कार्यान्वित.

Dehu Water Supply – गेल्या आठवड्यात इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राच्या नदीपात्रातील जॅकवेल, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि जलउपसा यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा मागील चार दिवसांपासून विस्कळीत झाला होता. मात्र देहू नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून सुमारे तीन ट्रक गाळ आणि राडारोडा हटविल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
महापुराच्या पाण्यामुळे नदीपात्रातील जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने जलउपसा प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण येऊन शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता, तर काही भागांमध्ये तो पूर्णपणे बंद झाला होता. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देहू नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली. पोकलेन मशीन, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ, वाळू आणि राडारोडा काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग परिश्रम घेत सुमारे तीन ट्रक गाळ बाहेर काढला. त्यानंतर जलउपसा केंद्रातील यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.
“महापुरामुळे सुमारे चार दिवस विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आला आहे. काही भागांतील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठाही पूर्ववत झाला असून नागरिकांना नियमित पाणी मिळत आहे. या काळात नागरिकांनी दाखविलेल्या संयम आणि सहकार्याबद्दल देहू नगरपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार.”
– धनंजय नाईकवाडे, पाणीपुरवठा अधिकारी, देहू नगरपंचायत





