pune : वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी पाणीटंचाई

काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुणे – आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना त्यांना पाणी कमी पडू देणार नाही, असा दावा पुणे महापालिकेने केला होता. मात्र, शुक्रवारी सकाळपासून नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ आदी भागांतील अनेक मुक्कामस्थळी वारकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाणीच आले नाही, तर काही ठिकाणी अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा झाल्याने वारकऱ्यांची गैरसोय झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या गुरुवारी रात्री पुण्यात मुक्कामी आल्या. त्यांच्यासोबत आलेले लाखो वारकरी शहरातील शाळा, मंगल कार्यालये आणि महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये थांबले आहेत. महापालिकेने शहरात १५ जूनपासून पाणीकपात सुरू केली होती.
मात्र, आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात येणार असल्याने पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली. त्यामुळे वारकऱ्यांना अखंडित पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. शुक्रवारी सकाळी अंघोळ, कपडे धुणे आणि इतर दैनंदिन गरजांसाठी वारकरी पाण्याच्या ठिकाणी गेले असता, अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरू असला, तरी दाब अत्यंत कमी असल्याने वारकऱ्यांना मोठ्या रांगा लावाव्या लागल्या. यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही अधिकाऱ्यांनी फोनला प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात आले.
आम्ही मुक्कामी असलेल्या भागात सकाळी पाणीच नव्हते. त्यामुळे आम्ही आसपासच्या लोकांकडे पाणी मागितले. नंतर आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी टँकर आले; पण पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. – रकमाबाई वाघ, महिला वारकरी
शहरातील एकूण पाणीपुरवठा सुरळीत आहे. काही शाळांमधील पाण्याच्या टाक्यांतील साठा संपल्याने समस्या निर्माण झाली. संबंधित ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग





