pune : उच्च शिक्षणात संतांच्या विचारांचा समावेश व्हावा!

डॉ. राहुल कराड यांची सरकारकडे मागणी; पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत
पुणे – सरकारने असे शैक्षणिक मॉडेल तयार करावे, ज्याद्वारे वारकरी संप्रदायाची परंपरा उच्च शिक्षणामध्ये समाविष्ट करता येईल. यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विज्ञान, अध्यात्म आणि वारी यांचा समन्वय साधून सुसंस्कृत नवी पिढी निर्माण करता येईल, असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी व्यक्त केले.
शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भावपूर्ण स्वागत माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
डॉ. राहुल कराड आणि विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी उषा कराड, कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, तसेच डॉ. एस. एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये यांच्यासह विद्यापीठातील पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राहुल कराड म्हणाले, नव्या पिढीशी समन्वय साधण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथेचे सर्व भाषांमध्ये भाषांतर होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा आणि वारकरी सांप्रदायाचा उच्च शिक्षणात कसा उपयोग करता येईल, यासाठी वैचारिक मंडळींनी एकत्र येणे आवश्यक आहे.





