pune : भक्तिरसात न्हाले मार्केट यार्ड!

भजन-कीर्तन, भारूड, भक्तिगीते आदी कार्यक्रम; व्यापारी अडत्यांकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा
महाप्रसाद, दैनंदिन गरजेच्या साहित्यांचे वाटप
२५ ते ३० हजार वारकऱ्यांचा मुक्काम
पुणे – टाळ-मृदंगांचा गजर, हाती भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, ‘माउली-माउली’चा गजर आणि पांडुरंगाच्या जयघोषात वैष्णवांचा मेळा गुरुवार (दि. ९) व शुक्रवारी (दि. १०) मार्केट यार्डात मुक्कामी होता. या दोन दिवसांत सुमारे २०० ते २५० दिंड्यांमधील २५ ते ३० हजार वारकऱ्यांनी येथे मुक्काम केला. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील व्यापारी, अडते आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवित वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी न्याहारी, महाप्रसाद, भारूड, कीर्तन, भजन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिरसात रंगलेल्या या कार्यक्रमांना वारकऱ्यांसह आडते आणि व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय वारकऱ्यांना दैनंदिन गरजेच्या साहित्याचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मार्केट यार्ड परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
मार्केट यार्डातील तरकारी, फळे, फुले, गूळ-भुसार विभाग तसेच केळी बाजारातील व्यापारी, आडते, कामगार आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन केले होते. वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, या भावनेतून प्रत्येक जण उत्साहाने सेवाकार्यात सहभागी झाला होता.
गूळ-भुसार विभागातील सुमारे ४० व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तसेच फळे-भाजीपाला विभागातील सुमारे १०० अडत्यांनी वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती. याशिवाय बाजार आवारात मोबाईल शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
दुकानमालक, दिवाणजी आणि कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्यरत होते. वारीसाठी आवश्यक रेनकोट, खाद्यान्न, पाण्याच्या बाटल्या, कपडे यांचे वाटप करण्यात आले. तसेच, अनेक दिंड्यांना आर्थिक मदतही व्यापारी वर्गाकडून देण्यात आली.
माउलीच्या सेवेत सहभागी झालेले व्यापारी
राजेंद्र बाठिया, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र गुगळे, प्रवीण चोरबेले, नितीन चोरडिया, गणेश चोरडिया, नवीन गोयल, विनोद गोयल, शंभू गोयल, मुकेश गोयल, उमेश मांडोत, राजू काग, बाळासाहेब कोयाळीकर, अशोक लोढा, युवराज काची, गणेश घुले,अनिरुद्ध (बापू) भोसले, सौरभ कुंजीर, रोहन जाधव, महेश शिर्के, राजेंद्र भंडारी, पारख फूड यांच्यासह मार्केट यार्डातील विविध व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, महाप्रसाद तसेच कीर्तन-भजन कार्यक्रमांचे आयोजन करून माउलीच्या सेवेत योगदान दिले.





