pune : मार्केट यार्डात दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल

बहुतांश दिंड्यांकडून पुढील प्रवासासाठी किराणा खरेदी
पुणे – आषाढी वारी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे शहरात आगमन झाल्यानंतर दोन दिवस मुक्कामी असतात. यासोबत असणाऱ्या बहुतांशी दिंड्या पुढील पंधरा दिवस लागणारा किराणा माल आणि कांदा, बटाटा पुण्यातील मार्केट यार्डातून खरेदी करतात. या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली
मार्केट यार्डातील भुसार बाजारातून पुण्यात मुक्कामी असणाऱ्या बहुतांशी दिंड्या किराणा माल खरेदी करतात. यामध्ये तेल, तांदूळ, गहू, ज्वारी, मसाले यांसह दररोज लागणारा विविध प्रकारचा माल खरेदी केला जातो.
या मध्यामातून भुसार विभागात दोन दिवसांत एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच, तरकारी विभागातून मोठ्या प्रमाणात कांदा, बटाटा, मिरची, लसूण खरेदी केला जातो. या मध्यामतून या विभागात साधारणतः एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, पुण्यात निघताना बहुतांशी दिंड्या बटाटा, कांदा, लसूण, हिरवी मिरची, आले पंधरा दिवस पुरेल इतके खरेदी केले जाते. कारण या वस्तू शक्यतो खराब होत नाहीत. त्यांनतर जशी जशी दिंडी पुढे जाईल तसे प्रत्येक दोन दिवसांनी लागेल तो भाजीपाला खरेदी केला जातो.
पुण्यातून पालखीचा पुढचा खरा प्रवास सुरू होतो. पुण्यामध्ये आलेल्या बहुतांशी वारकऱ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था होते. पुण्यातून पुढे गेल्यानंतर त्या त्या दिंड्यांना स्वतंत्र स्वयंपाक करण्याची गरज लागते. त्यानुसार लागेल तेवढा माल बहुतांशी दिंड्या पुण्यातून खरेदी करून पुढे जातात.
पुण्यातून पुढे प्रस्थान करताना अनेक दिंड्या किराणा माल मार्केट यार्डातून खरेदी करतात. भुसार विभागात बहुतांशी माल घाऊक दरात मिळतो. तसेच, मार्केट यार्डात दरवर्षी २५ ते ३० हजार वारकरी मुक्कामाला असतात.
– विजय मुथा, संचालक, दि पुना मर्चंटस चेंबर





