pune: ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट

पुणे – पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे नऊ हजार कीट देण्यात आले. यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवांची गैरसोय न होता वारकऱ्यांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालखीसमवेत लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात. १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करते. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या भागांतून पालखीचे मार्गक्रमण होताना २७०० पुरुष आणि ३०० महिला पोलीस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी तीन हजार कीट उपलब्ध करून देण्याची विनंती सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने केली होती.
याशिवाय आषाढी वारीसाठी राज्यभरातील शेकडो पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. या सोहळ्यात भक्तांचीही मोठी संख्या असते. या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात सहा हजार ५०० पुरुष, तर २००० महिला पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.
त्यांनाही अशाच प्रकारच्या साहित्याचे कीट उपलब्ध करून देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी सात हजार, तर सातारा ग्रामीण पोलीस दलासाठी दोन हजार, असे नऊ हजार कीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या कीटमध्ये कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड या वस्तू देण्यात आल्या आहेत.
पावसाच्या परिस्थितीतही पोलीस बांधव हे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून, ती करत असताना त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मागील वर्षीही पोलीस बांधवांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही संधी मिळाली, याचे मनापासून समाधान आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक





