Pune Water Cut : यावर्षी सरासरीपेक्षा कमी मान्सून पडणार असल्याने पाटबंधारे विभागाने पाणीकपातीची सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार प्रशासनाने पालिका आयुक्तांना तीन पर्याय दिले आहेत. पाणी कपात टाळणे, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणी बंद ठेवणे असे तीन पर्याय आयुक्तांसमोर ठेवले आहेत. आता आयुक्त काय निर्णय घेतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. भारतीय हवामान खात्याने अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी मान्सून पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील पाणीसाठा १ ऑगस्ट पर्यंत राखीव ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यासाठी महापालिकेने दरमहा १५ टक्के पाणीकपात करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने पाण्याची सद्यस्थिती तसेच कपात केल्यास काय स्थिती असेल याचा अहवाल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सादर केला आहे. अहवालात पहिला पर्याय कपात टाळण्याचा आहे. दुसरा पर्यंत आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवणे तर तिसरा पर्याय दिवसाआड पाणीपुरवठ्याचा आहे. त्यामुळे आता आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त पर्याय एक शहराची वाढती मागणी आणि विस्तार यानुसार सद्यस्थितीत शहराकरिता १६२२.५ एमएलडी पाणी उचलण्यात येते. सद्यस्थितीत उचलण्यात येणाऱ्या १६२२.५ एमएलडीमधून १५% पाणीकपात करावयाची झाल्यास धरणातून २५३.८७ एमएलडी पाणी कमी उचलावे लागणार आहे. पुणे शहराची भौगोलिक परिस्थिती चढउताराची असल्यामुळे आणि एकत्रित कामे सद्या अपूर्ण असल्यामुळे सरसकट १५% पाणीपुरवठा कमी केल्यास चढाच्या भागातील आणि टाकीपासून लांबच्या अंतरावरील भागामध्ये पाणीपुरवठा अत्यल्प होणे किंवा पाणी उपलब्ध न होणे अशा तक्रारी येतील. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीपुरवठा कमी करणे शक्य होणार नाही. पर्याय दोन दुसरा पर्याय आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा आहे. त्यानुसार एक दिवस पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या दिवशी काही लाईन बदलण्यासाठी आणि नेटवर्कमध्ये प्रेशर ठेवण्यासाठी जादा पाणीपुरवठा करावा लागतो. याचा विचार करता, सर्वसाधारणपणे आठवड्यातून एक दिवस क्लोजर घेतल्यास १० टक्के पाणी कपात होऊ शकते. मात्र, एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यास पुढे दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होण्यास जातात. त्यामुळे, गोंधळाची स्थिती निर्माण होते. पर्याय तीन तिसरा पर्याय हा एक दिवसाआड पाणीकपातीचा आहे. त्यानुसार कपात केल्यास पाणी पुरवठ्याच्या दिवशी वरीलप्रमाणे नेटवर्कमध्ये प्रेशर राखणे आणि रिकाम्या लाईन भरणे यासाठी जादा पाणीपुरवठा करावी लागेल. याचा विचार करता २५ टक्के पर्यंत पाणीकपात होऊ शकते. मात्र, पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुलनेने कमी तक्रारी येतात. तसेच या पूर्वीही प्रशासनाने शहरात असा प्रयोग केला आहे.