Pune Water Crisis: पुन्हा पाणीकपातीचे संकट? खडकवासला धरणसाखळीत १० वर्षांतील सर्वात नीचांकी धरणसाठा
Pune Water Crisis: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ११.८२ टीएमसीने पाणी कमी; आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे जलसंपदा विभागासमोर आव्हान.

Pune Water Crisis- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये दि. १ जुलैअखेर एकूण उपयुक्त पाणीसाठा सुमारे ३.७७ टीएमसी शिल्लक आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत हा पाचव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाणीसाठा ठरला आहे. यापेक्षा कमी साठा केवळ २०१६, २०२२, २०१९ आणि २०१८ मध्ये नोंदविण्यात आला होता.
त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरासमोर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी टेमघर धरणातही अद्याप उपयुक्त पाणीसाठा तयार झालेला नाही. वरसगाव धरणात १.५५८ टीएमसी, पानशेतमध्ये १.९०७ टीएमसी आणि खडकवासला धरणात ०.३०५ टीएमसी असा साठा असून चारही धरणांमधील एकूण उपयुक्त साठा ३.७७० टीएमसी आहे. धरणसाखळीतील सर्वाधिक क्षमता असलेल्या पानशेत आणि वरसगाव धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने आगामी पावसावरच शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्था अवलंबून राहणार आहे.
मागील १० वर्षांतील आकडेवारी :
मागील १० वर्षांच्या आकडेवारीवरून धरणसाठ्यांत मोठी चढ-उतार दिसून येतात. २०२५ मध्ये १ जुलैला सर्वाधिक १४.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. त्यापूर्वी २०२१ मध्ये ८.६६ टीएमसी, २०२० मध्ये ५.२६ टीएमसी, २०२३ मध्ये ५.१० टीएमसी, २०२४ मध्ये ४.१५ टीएमसी आणि २०१७ मध्ये ४.०५७ टीएमसी साठा नोंदविण्यात आला होता.
यावर्षीचा ३.७७० टीएमसी साठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११.८२ टीएमसीने कमी आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती आणि जूनमध्येही दमदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी जून महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये अपेक्षित पाणी जमा होऊ शकले नाही.





