PMC Tree Plantation: महापालिकेचा दीड कोटींचा ‘मेगा प्लॅन’; आता झाडांच्या संवर्धनासाठी प्रत्येक वॉर्डात होणार हे काम
PMC Tree Plantation: 'वनमहोत्सव २०२६' अंतर्गत ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; महापालिका आणि वन विभागाची लवकरच संयुक्त बैठक.

PMC Tree Plantation – पुणे शहरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरूवारी दिली. बैठकीत वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या नियमित बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत राहणार आहे. या पथकामार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, धोकादायक वृक्षांची छाटणी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि देखभालीची कामे करण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले. वनमहोत्सव २०२६ अंतर्गत पुणे वनक्षेत्रात ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही शहरासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक वृक्षारोपण आराखडा तयार करावा, यासाठी प्रशासनाला निर्देश दिल्याचे भिमाले यांनी सांगितले. संयुक्त वन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आणि वन विभाग यांच्यात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापनासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्या माध्यमातून शहरात वनीकरणाचे विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे भिमाले यांनी नमूद केले.





