पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग विद्यार्थ्यांमार्फत मतदान जागृती

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघ मतदार जागृती कार्यक्रम अंतर्गत सदाशिव पेठ, कुमठेकर रोड येथील नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेज्ड या संस्थेत मतदार जागृती कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबतचे महत्त्व समजावून सांगितले. कसबा विधानसभा मतदार संघाचे नोडल ऑफिसर शरद मेमाणे आणि शिक्षण विभाग पुणे महापालिकेच्या सहा. प्रशासकीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी समग्र शिक्षा अभियान डॉ. मनोरमा आवारे यांनी दिव्यांग मतदारांच्या मतदान सुविधा आणि हक्क बजावण्याचे महत्त्व विशद केले.
जयवंत बोरसे यांनी कर्णबधीर, मूक-बधीर आणि नेत्रहीन अशा ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह उपस्थित सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ दिली. त्या सर्व विद्यार्थांनी संकल्प पत्र भरले. तसेच कुमठेकर रस्त्यावर विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांनी मानवी साखळी तयार केली आणि मतदार जागृतीच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमासाठी डोअर स्टेप स्कूल फाउंडेशन पुणे यांचे परिवर्तन प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वंयसेवक म्हणून कामकाज केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी कसबा विधानसभा मतदार संघाचे नोडल ऑफिसर शरद मेमाणे आणि शिक्षण विभाग पुणे महापालिकेच्या सहा. प्रशासकीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी समग्र शिक्षा अभियान डॉ. मनोरमा आवारे, दिव्यांग नोडल ऑफिसर पूर्वा जोशी, नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेज्ड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख, विश्वस्त देवता अंदुरे-देशमुख, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षक सुमन बगाड, जयवंत बोरसे, महेश जगताप, डोअर स्टेपच्या परिवर्तन प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक फडके आणि त्यांचे सहकारी, विनित जोशी आदी उपस्थित होते.





