Pune :पीडित मुलीस संवाद व समुपदेशनाची गरज; उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांची सूचना

पुणे – महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींवर चार जणांनी केलेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना गुड टच, बॅड टच या उपक्रमांतून उघडकीस आली.
त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या उपक्रमासह मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही यंत्रणेसह विशाखा समिती आणि समुपदेशन वेळच्यावेळी होणे आवश्यक असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
संबेधित घटनेत आरोपींविरोधात पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, यातील दोन आरोपी सज्ञान आहेत. या घटनेवरून आजही मुली भितीपोटी घडलेल्या गोष्टी सांगत नाही. त्यामुळे त्यांच्याशी वेळच्यावेळी संवाद साधून समुपदेशन होणे आवश्यक आहे. याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत सूचना दिल्या आहेत.
शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी त्या परिसरात २४ तास सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन अंतर्गत विशाखा समिती सेल असावी. मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून त्याचे प्रसारण किंवा विक्री होत असेल तर त्याची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई व्हावी.
संबधित घटनेतील आरोपींवर कडक कलमे लावून, जामीनास कसून विरोध करून आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन, मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.





