Pune | पुणे विद्यापीठाने राजकीय दबाव झुगारून कारवाई करण्याची अपेक्षा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मराठवाडा विद्यापीठाने नियमांची पायमल्ली करणाऱ्या ११३ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांवर निर्बंध लादले आहे. या पावलावर पाऊल टाकून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. विद्यापीठाशी संलग्न शेकडो महाविद्यालयांत भौतिक सुविधा, शिक्षक, नॅक मूल्यांकनाचा अभाव असताना काहीही कारवाई होत नाही. राजकीय दबाव झुगारून या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे धाडस विद्यापीठ दाखवणार का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
विद्यापीठाच्या अधिपत्याखालील ९०० महाविद्यालयांपैकी अनेक संस्था केवळ नावापुरत्या सुरू आहेत. काही ठिकाणी शिक्षक नाहीत, काही ठिकाणी प्राचार्य नाहीत. काही ठिकाणी परीक्षा नियंत्रकच त्या-त्या महाविद्यालयातीलच प्राचार्य असतो. हे सर्व प्रकार नियमाचे सरळ सरळ उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अशा महाविद्यालयांवर विद्यापीठ कारवाई करणार की नेहमीप्रमाणे राजकीय दबावापुढे झुकणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोझे कॉलेज तर हिमनगाचे टोक
वाघोलीतील पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कारवाई केली खरी, पण त्याआधीच विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालयातील भीषण वास्तव उजेडात आणले होते. गोपनीय कक्षांना काचा नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत, विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत, मान्यताप्राप्त प्राचार्य नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यासारखेच, परीक्षा नियंत्रक आणि प्राचार्य एकाच व्यक्तीकडे, असे चित्र दिसून आले होते. असेच चित्र कमी-जास्त प्रमाणात अन्य महाविद्यालयात असण्याची शक्यता आहे. या वास्तवाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुदानित महाविद्यालयांनी नॅकची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र विनाअनुदानित तत्वावर असलेल्या अनेक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाकडे पाठ फिरविली आहे. सध्या नॅक मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची संख्या किती आहे, याची आकडेवारी प्रसिद्ध झाली नाही. मात्र शेकडो महाविद्यालयात अजूनही भौतिक सुविधा नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे विद्यापीठाने काही ठोस निर्णय घेण्याची नितांत गरज आहे.
मार्चअखेर नॅक मूल्यांकनप्राप्त महाविद्यालयांची संख्या
जिल्हा – विनाअनुदानित काॅलेज
-पुणे – २८५
-नगर – ४७
-नाशिक – ७८
-दादर नगर हवेली – २





